राज्यात आज मुसळधार पाऊस, उद्यापासून सूर्यदर्शनाची शक्यता!

राज्यात आज मुसळधार पाऊस, उद्यापासून सूर्यदर्शनाची शक्यता!


महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अत्यंत महत्त्वाचा व दिलासादायक हवामान अंदाज जाहीर केला आहे. आज ३१ जुलै रोजी संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत आज पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळेल, तर नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नाशिकच्या दुतोंड्या मारुतीला पाणी लागण्याची दाट शक्यता आहे.

जायकवाडी धरण १००% भरण्याचा मार्ग मोकळा व मराठवाड्याला दिलासा

नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पैठण येथील जायकवाडी धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या जायकवाडी धरण ७४ टक्क्यांपर्यंत भरले असून येत्या १० ऑगस्टपर्यंत हे धरण ९० ते १०० टक्के भरण्याचा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आज दिवसभर परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव व जालन्यात पावसाची संततधार कायम राहील, तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतही दिवसभर पाऊस सक्रिय राहणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील आजची स्थिती

पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. दुसरीकडे शिर्डी, कोपरगाव, राहुरी, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री, सिंदखेडराजा, चिखली आणि बुलढाणा या भागांत आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील किनवट भागासह अनेक ठिकाणी शेतात व घरांमध्ये पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे आजच्या दिवशी सर्व शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

१ ऑगस्टपासून राज्यात उघडीप आणि सूर्यदर्शन!

सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी समाधानाची बाब म्हणजे उद्या, १ ऑगस्टपासून राज्यातील हवामानात मोठा बदल होणार आहे. उद्यापासून पूर्व व पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस ओसरून चांगले सूर्यदर्शन होण्यास सुरुवात होईल. १ ते ५ ऑगस्ट दरम्यान राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप पाहायला मिळेल, ज्यामुळे शेतकरी बांधवांना कोळपणी, निंदणी व खत व्यवस्थापनाची खोळंबलेली कामे पूर्ण करता येतील. तथापि, २ ते ५ ऑगस्ट दरम्यान सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या ते एका तासाचा जोरदार पाऊस पडू शकतो. हवामानातील हा बदल लक्षात घेऊन सर्वांनी आपल्या शेतीकामांचे नियोजन करावे.

Leave a Comment