एल निनोचा वाढता धोका: हवामान बदलामुळे जागतिक संकट गडद

एल निनोचा वाढता धोका: हवामान बदलामुळे जागतिक संकट गडद

जागतिक पातळीवर वातावरणातील बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर परिणाम समोर येत असतानाच हवामानाबाबत एक चिंताजनक इशारा देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान विषयक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, येणारे वर्ष मानवी इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या वाढत्या तापमानाला आणि दुष्काळी परिस्थितीला सध्या सक्रिय असलेला ‘एल निनो’ घटक प्रामुख्याने कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जागतिक हवामान संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी काही महिने एल निनोची स्थिती कायम राहण्याची शक्यता जवळपास १०० टक्के आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशा गंभीर धोक्याबाबत इतक्या तीव्र स्वरूपात इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भासह देशातील विविध भागांवर आधीच एल निनोमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचा प्रभाव दिसत असताना, या नवीन अंदाजामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनीही या भीषण स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. महासागर वेगाने तापत असून आपली पृथ्वी एका अनोळखी आणि धोकादायक प्रवासावर निघाली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. प्रशांत महासागरातील वारे मंदावल्यामुळे समुद्राचे पृष्ठभागावरील पाणी तापते आणि दर दोन ते सात वर्षांनी एल निनोची स्थिती निर्माण होते. सध्या हे तापमान नेहमीपेक्षा सुमारे दोन ते अडीच अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले असल्याने हा एल निनो अधिक घातक ठरत आहे.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, वर्षाच्या अखेरीस नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान प्रशांत महासागराचे तापमान सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकते. त्या काळात एल निनोची तीव्रता सर्वाधिक राहण्याची भीती आहे. या हवामान बदलाच्या संकटामुळे जगातील अनेक भागांमध्ये भीषण दुष्काळ, चक्रीवादळे आणि अवकाळी पावसाचे तांडव पाहायला मिळण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.

या महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक हवामान संघटनेने जगभरातील देशांना हवामानाविषयी पूर्वसूचना देण्याची यंत्रणा अधिक वेगाने सक्रिय केली आहे. शेती क्षेत्रात दुष्काळरोधक पिकांची निवड करावी तसेच कृषी, आरोग्य, ऊर्जा आणि जलव्यवस्थापनामध्ये तातडीने योग्य नियोजन व उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच साधारण एप्रिल महिन्यापर्यंत एल निनोचा प्रभाव हळूहळू पूर्णपणे ओसरू शकतो. त्यामुळे पुढील वर्षातील भारतीय उपखंडातील मान्सून सामान्य राहण्याची सकारात्मक आशा निर्माण झाली आहे.

Leave a Comment