कर्जमाफी ची दुसरी यादी कधी येणार, कर्जमाफी ची रक्कम खात्यात कधी…
कर्जमाफी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ राबवली जात असून शेतकरी पुढील यादीची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या यादीत नाव आलेल्या आणि ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना खात्यात रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा आहे. तर ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, ते शेतकरी बँक कर्जखाते ‘निल’ (Nill) होणे आणि नव्याने पीककर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. विविध कार्यक्रमांमधून येणाऱ्या वक्तव्यांमुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो, त्यामुळे या योजनेची अधिकृत आणि वस्तुस्थिती दर्शक माहिती समजून घेणे आवश्यक आहे.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, कर्जमाफीच्या पहिल्या प्रसिद्ध यादीमध्ये सुमारे १७ लाख शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. यापैकी ई-केवायसी पूर्ण केलेल्या पहिल्या टप्प्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना सुमारे ५,०२९ कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात २४ ऑगस्टपासून ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांना सुमारे ५,०८६ कोटी रुपयांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण १२ लाख ५८ हजार ३६ शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वितरणाला मंजुरी मिळालेली आहे.
शासनाकडून निधीच्या उपलब्धतेचा विचार केल्यास, योजनेसाठी सुरुवातीला ७,००० कोटी आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नव्याने ४,००० कोटी असा एकूण ११,००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. यापैकी सुमारे १०,११५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून, सद्यस्थितीत शासनाकडे सुमारे ८८६ कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे.
पहिल्या १७ लाख शेतकऱ्यांच्या यादीपैकी ई-केवायसी प्रलंबित असलेले अथवा मंजुरीची प्रक्रिया बाकी असलेले सुमारे ४ लाख ४१ हजार ९६४ शेतकरी अजूनही खात्यात पैसे जमा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आणि पुढील वितरण यादी साधारणपणे ८ ते ९ सप्टेंबरच्या दरम्यान येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी आवश्यक असणारा अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित झाल्यानंतरच प्रत्यक्ष वितरणाला गती मिळेल.
दुसऱ्या बाजूला, राज्यातील एकूण ५६ लाख कर्जदार शेतकऱ्यांपैकी सुमारे २१ लाख ९७ हजार शेतकरी विविध निकषांमुळे अपात्र ठरले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांमध्ये सुमारे ३ लाख ६९ हजार खाती ही ‘एकरकमी परतफेड’ (OTS) योजनेअंतर्गत येतात, तर सुमारे १२ ते १३ लाख खात्यांची दुबार कर्ज, बँक दुरुस्ती आणि ऑडिटसंबंधी छाननी सुरू आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच या नियमित कर्जदारांची पुढील यादी प्रसिद्ध केली जाईल, ज्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
सध्या निधी वाटपाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असून सहकार विभागाच्या अधिकृत सूचना आणि शासन निर्णयानंतरच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष निधी वर्ग केला जाईल.