पंजाब डख हवामान अंदाज: राज्यात सप्टेंबर महिन्यात पावसाची जोरदार पुनरागमन, पाहा सविस्तर अंदाज
राज्यात ऑगस्ट अखेरीस स्थानिक वातावरण तयार होऊन २९ आणि ३० ऑगस्ट रोजी काही भागांत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वदूर नसून ठिकठिकाणी पडेल. मात्र, ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेला पाऊस सप्टेंबरच्या सुरुवातीपासून राज्यात पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे सक्रिय होणार आहे.
१ व २ सप्टेंबरचा पाऊस:
१ आणि २ सप्टेंबर रोजी सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, बारामती, पंढरपूर, श्रीगोंदा, कडा-आष्टी, बीड तसेच कोकण किनारपट्टी व घाटमाथ्यावरील परिसरात पावसाची सुरुवात होईल. हा पाऊस पिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
४ ते ६ सप्टेंबरचा पाऊस (विदर्भ व उत्तर महाराष्ट्र):
४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून विदर्भ, खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाला जोर येईल. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि कन्नड परिसरामध्ये ४, ५ आणि ६ सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
६ ते ९ सप्टेंबरदरम्यान मराठवाडा व इतर भाग:
६, ७ आणि ८ सप्टेंबर दरम्यान सोलापूरसह पावसाची प्रतीक्षा असलेल्या भागांत पाऊस हजेरी लावेल. त्यानंतर ७, ८ आणि ९ सप्टेंबर दरम्यान अहिल्यानगर (अहमदनगर), बीड, लातूर, धाराशिव, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची शक्यता आहे.
हा पाऊस सर्वदूर एकाच वेळी नसून ठिकठिकाणी ‘भाग बदलत’ पडणार आहे. तरीही हा पाऊस पिकांना नवसंजीवनी देणारा ठरेल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या शेतीकामांचे नियोजन करावे.