अमेरिकेच्या सोयाबीनला वाढती मागणी आणि हवामानाचा फटका; आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर तेजीत

अमेरिकेच्या सोयाबीनला वाढती मागणी आणि हवामानाचा फटका; आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर तेजीत

आंतरराष्ट्रीय बाजारात तीन वर्षांतील उच्चांक

जागतिक पातळीवर यंदा सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असतानाही आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावाने गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड (CBOT) वर सोयाबीनचे वायदे प्रति बुशेल १२.७९ डॉलरच्या पातळीवर पोहोचले आहेत. गेल्या एका महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात सुमारे ७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. सुरुवातीला अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) यंदा जागतिक उत्पादन ४,४२० लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा आणि ब्राझील व अमेरिकेत उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तवला होता; मात्र सध्याच्या बदलत्या घडामोडींमुळे बाजारातील चित्र बदलताना दिसत आहे.

प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घटीची शक्यता

जागतिक स्तरावर विक्रमी उत्पादनाचे अंदाज असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती हवामानामुळे आव्हानात्मक बनली आहे. अमेरिकेतील प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यांमध्ये वाढलेली उष्णता आणि पावसाच्या खंडामुळे पिकावर विपरीत परिणाम झाला असून, प्रत्यक्ष उत्पादन अंदाजापेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे ‘एल निनो’च्या प्रभावामुळे ब्राझीलमधील उत्पादनातही घट होण्याचा अंदाज काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी व्यक्त केला आहे. या हवामानविषयक अनिश्चिततेमुळे बाजारात तेजीचा कल निर्माण झाला आहे.

चीनसह आशियाई देशांकडून अमेरिकन सोयाबीनची मोठी खरेदी

अमेरिकेत नवीन सोयाबीनची काढणी तोंडावर असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारातून या पिकाला मोठी मागणी मिळत आहे. विशेषतः चीनमध्ये पूर, दुष्काळ आणि वाढत्या उष्णतेमुळे स्थानिक उत्पादनाला फटका बसल्याने चीनने अमेरिकेकडून सोयाबीनची आगाऊ खरेदी वेगाने सुरू केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, चीनने अमेरिकेच्या नवीन पिकाचे सुमारे ६५ लाख टन, तर आशियातील इतर देशांनी जवळपास ४६ लाख टनांचे सौदे केले आहेत. काढणीच्या आधीच झालेल्या या मोठ्या खरेदीमुळे जागतिक बाजाराला मोठा आधार मिळाला आहे.

बायोडिझेल आणि स्थानिक गाळपाला गती

जागतिक पातळीवर इंधनाचे वाढलेले दर आणि भू-राजकीय तणावामुळे अमेरिकेत बायोडिझेलसाठी सोयाबीन तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे अमेरिकेतील स्थानिक सोयाबीन गाळपात (Crushing) सुमारे साडेचार टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे. स्थानिक बाजारातील वाढता वापर आणि निर्यातीची भक्कम मागणी या दोन्ही घटकांमुळे नवीन पीक बाजारात येण्याच्या काळातही अमेरिकेत सोयाबीनचे भाव चढेच राहिले आहेत.

देशांतर्गत बाजार आणि शेतकऱ्यांसाठी स्थिती

भारतात सध्या सोयाबीनचे दर ६,००० ते ६,४०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहेत. देशात मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील काही भागांत पावसाअभावी पिकावर ताण पडत असल्याने उत्पादकतेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. दरवर्षी नवीन आवक सुरू होताना दरात मंदी पाहायला मिळते; परंतु यंदा आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, संभाव्य उत्पादन घट आणि हमीभावाचा भक्कम आधार यामुळे देशांतर्गत बाजारात दर स्थिर राहण्यास मदत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

 

Leave a Comment