El Nino Alert: गेल्या १०० वर्षांतील सर्वात भयंकर ‘एल निनो’चा इशारा; भारतातील दोन कृषी हंगामांना फटका बसण्याची शक्यता
El Nino alert : या वर्षीचा ‘एल निनो’ गेल्या १०० वर्षांतील सर्वात भीषण ठरण्याची शक्यता असून, यामुळे जागतिक हवामानात प्रचंड उलथापालथ होऊ शकते, असा धोक्याचा इशारा ब्रिटनच्या हवामान विभागाने (मेट ऑफिस) दिला आहे. प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा तब्बल ३ अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या बदलाचा थेट फटका भारताच्या शेती क्षेत्राला बसणार असून, देशातील खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशांत महासागराच्या तापमानात अभूतपूर्व वाढ
ब्रिटनच्या मेट ऑफिसमधील हवामानशास्त्रज्ञ ॲडम स्केफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या नोव्हेंबरपर्यंत प्रशांत महासागरातील तापमानवाढ ३.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. हा आकडा २०१५ मधील विक्रमी एल निनोलाही मागे टाकेल. एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे २०२७ हे वर्ष जागतिक इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरू शकते. हवामान तज्ज्ञांच्या मते, ही केवळ तात्पुरती स्थिती नसून याचे जागतिक हवामानावर दीर्घकालीन परिणाम दिसून येतील.
भारताच्या मान्सूनवर आणि शेतीवर परिणाम
मान्सूनवर ताण: भारतीय हवामान विभागानुसार (IMD), यंदाचा पाऊस सरासरीच्या केवळ ९० टक्के राहण्याचा अंदाज आहे, जो गेल्या ११ वर्षांतील नीचांकी स्तर ठरू शकतो.
दुहेरी फटका: पावसाने ओढ दिल्याने सध्याच्या खरीप पिकांवर विपरीत परिणाम होत असून, पुढील रब्बी हंगामावरही याचे सावट राहण्याची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटा: आयएमडीचे शास्त्रज्ञ ओ. पी. श्रीजित यांच्या माहितीनुसार, भारतात पुढील वर्षात तीव्र उष्णतेच्या लाटा जाणवू शकतात.
‘एल निनो’ म्हणजे नेमके काय?
‘एल निनो’ ही पॅसिफिक महासागरात घडणारी एक नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. यात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अचानक वाढते, ज्यामुळे जगभरातील वाऱ्यांची दिशा, वातावरणाचा दाब आणि पर्जन्यचक्र विस्कळीत होते. साधारणपणे दर दोन ते सात वर्षांनी ही स्थिती निर्माण होते आणि सुमारे ९ ते १२ महिने टिकून राहते. भारताचा विचार केल्यास, एल निनोच्या सक्रियतेमुळे मान्सूनचा पाऊस कमकुवत होतो आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते.