Epik pahni खरीप हंगाम ई-पीक पाहणी सुरू; शेवटची तारीख व महत्त्वाचे निर्देश
Epik pahni राज्य शासनाच्या माध्यमातून बहुप्रतिक्षित असलेली खरीप हंगामाची ई-पीक पाहणी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे अपर मुख्य सचिव यांच्यामार्फत सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना परिपत्रक जारी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ही पीक पाहणी ‘डीसीएस एमएच’ (DCS MH – Digital Crop Survey) या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. यासाठी पीक पाहणी सहायकांची नेमणूक करण्यात आली असून, सहायकांच्या माध्यमातून १००% ई-पीक पाहणीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
यापूर्वी १० ऑगस्टपूर्वी सहायकांमार्फत झालेली पीक नोंदणी निरंक करून १० ऑगस्टपासून नवीन स्वरूपात ई-पीक पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आता ११ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर या कालावधीत खरीप हंगामाची संपूर्ण ई-पीक पाहणी प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या मोहिमेअंतर्गत गट क्रमांक व सर्व्हे क्रमांकनिहाय शेतातील प्रत्यक्ष पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून ‘क्रॉप रजिस्ट्री’ अद्ययावत केली जाईल. यासाठी महसूल आणि कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून क्षेत्रीय पातळीवरील अडचणी सोडवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित व्हिडिओ: http://www.youtube.com/watch?v=GuWuVtlbjN8