PMFBY ॲपद्वारे पीक नुकसानीची पूर्वसूचना (Crop Loss Intimation) कशी नोंदवावी?
राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने मोठी दडी मारल्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. अनेकदा पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीत अपेक्षित नुकसान न दिसल्यास शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागते. अशा वेळी पिकांचे झालेले नुकसान सिद्ध करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून ‘पीएमएफबीवाय’ (PMFBY) ॲपच्या माध्यमातून पीक नुकसानीची पूर्वसूचना (Crop Loss Intimation) नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे नुकसानीचा ठोस पुरावा प्रशासनाकडे व पीक विमा कंपनीकडे नोंदवला जातो.
पीक नुकसानीची नोंद करण्यासाठी सर्वप्रथम मोबाईलमध्ये ‘Crop Insurance’ (PMFBY) हे ॲप्लिकेशन उघडावे. पीक विमा अर्ज भरताना जो मोबाईल क्रमांक दिला होता, तोच क्रमांक टाकून त्यावर येणारा ओटीपी (OTP) प्रविष्ट करून ॲपमध्ये लॉगिन करावे. लॉगिन झाल्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या ‘Crop Loss Intimation’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपले राज्य (महाराष्ट्र), हंगाम (खरीप) आणि वर्ष निवडून पुढे जावे (Proceed करावे). नवीन क्लेम नोंदवण्यासाठी ‘New’ पर्याय निवडून ज्या पिकाचे नुकसान झाले आहे, ती संबंधित विमा पॉलिसी निवडावी.
पॉलिसी निवडल्यानंतर मोबाईलच्या लोकेशनची (GPS) परवानगी देऊन शेताचे अचूक स्थान अपडेट करावे. त्यानंतर कॅमेऱ्याच्या माध्यमातून शेताच्या चारही कोपऱ्यांचे प्रत्येकी एक असे एकूण ४ फोटो स्पष्टपणे काढून अपलोड करावेत. यासोबतच पिकाच्या सद्यस्थितीचा, म्हणजेच फुलोरा जळणे किंवा पिकाची झालेली हानी स्पष्ट दिसेल असा १ जवळचा (क्लोज-अप) फोटो आणि शेताचा १० सेकंदांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ॲपमध्ये अपलोड करावा. हे सर्व फोटो आणि व्हिडिओ योग्य रीतीने अपलोड झाल्यावर ‘Save & Next’ वर क्लिक करावे.
पुढील टप्प्यात नुकसानीचे कारण निवडावे लागते. सध्या दुष्काळ अधिकृतपणे जाहीर झालेला नसल्याने ‘Drought’ पर्याय निवडण्याऐवजी पावसाच्या खंडासाठी ‘Dry Spell’ हा पर्याय निवडावा. पीक सध्या शेतात असल्याने ‘Standing Crop’ पर्याय निवडून नुकसानीची तारीख आणि वेळ प्रविष्ट करावी. शेवटी रिमार्क्स/कमेंटच्या रकान्यात गेल्या १०, १५ किंवा २० दिवसांपासून पाऊस पडलेला नाही (उदा. No rain from last 15-20 days) अशी स्पष्ट नोंद करून अर्ज सबमिट करावा.
अर्ज सबमिट केल्यानंतर माहिती अपलोड होऊन तात्काळ ‘Intimation Number’ (दावा क्रमांक) जनरेट होतो. हा इंटिमेशन नंबर आणि अर्जाचा तपशील शेतकऱ्यांनी आपल्याकडे सुरक्षित जपून ठेवावा. भविष्यात महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगात उत्पादन जास्त दाखवले गेले किंवा विम्याबाबत काही अडचण निर्माण झाली, तर हा नोंदवलेला दावा हक्काचा विमा मिळवण्यासाठी आणि तक्रार मांडण्यासाठी एक भक्कम पुरावा म्हणून उपयोगी ठरतो.