हवामान अपडेट: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज!

हवामान अपडेट: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज!

ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नसला तरी आता हवामान प्रणालींच्या सक्रियतेमुळे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बातमीतील महत्त्वाचे मुद्दे:

अल निनोचा प्रभाव: यावर्षी हवामान बदलाचे चटके प्रकर्षाने जाणवत असून प्रशांत महासागरातील ‘अल निनो’ स्थितीचा वाढता प्रभाव उर्वरित मान्सूनच्या हंगामावर राहण्याची शक्यता हवामान विभागाने पूर्वीच व्यक्त केली आहे.

पावसात १३.७ टक्के तूट: ऑगस्ट महिन्यात देशातील ७० टक्क्यांहून अधिक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे. चालू हंगामातील आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एकूण १३.७ टक्के पावसाची तूट आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र: बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. याचा सर्वाधिक प्रभाव सध्या ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालवर जाणवत आहे. या प्रणालीमुळे राज्यातील विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

३ ते १० सप्टेंबरदरम्यान पाऊस, नंतर जोर ओसरणार: हवामान विभागाच्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, ३ ते १० सप्टेंबर दरम्यान कोकणातील जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील काही भाग तसेच विदर्भातील काही भागांमध्ये चांगला पाऊस पडेल. मात्र, १० सप्टेंबरनंतर राज्यात पावसाचा जोर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment